Advertisement
धुळे : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. यानंतर राज्यातील जनतेमध्ये समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटाच्या विरोधातही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यात शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. दादा भुसे हे धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या दौर्यादरम्यान शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ok अशा जोरजोरात घोषणा देत यावेळी शेतकर्यांनी दादा भुसे यांचा निषेध केला. एकीकडे शेतकरी मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जोरजोरात घोषणा देत होते. त्यांना काळे झेंडे दाखवत होते. या शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान यावेळी मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्या शेतकर्यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही.