Advertisement
यवतमाळ : शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या पक्ष चिन्ह धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे गटाची धावाधाव सुरू आहे. पण, यवतमाळमध्ये शिंदे गटाला चिन्ह सुद्धा मिळाले आहे. चक्क शिंदे गटाच्या नावावर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील येत्या 18 सप्टेंबर रोजी 73 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य या पदासाठी निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने गाव पुढारी कामाला लागले असून राज्यातील शिंदे गटाच्या नावावर ही निवडणूक लढविली जात आहे. या निवडणुकीत एकूण 11 सदस्य आणि सरपंचासाठी थेट जनतेतून निवडणूक होत आहे. यवतमाळ शहरापासून 18 किमी अंतरावर असलेल्या बंजारा बहुल गावात सरपंचपदाची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नावावर पॅनल तयार करून लढविली जात आहे. या पॅनलचे बोधचिन्ह सुद्धा मिळाले आहे. हितेश जाधव हे सरपंचपदाचे उमेदवार आहे त्यांचे बोधचिन्ह हे फुटबॉल आहे. या पॅनलने आपल्याला मतदान करावे, यासाठी गावभरात बॅनर सुद्धा लावले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाने पॅनल काढल्यामुळे गावात एकच चर्चा रंगली आहे.