Advertisement
श्रीगोंदा : मुलं ही देवा
घरची फुलं असतात, या मुलांमध्ये तर अक्षरश: देव दिसतो. या मुलांमध्येच परमेश्वर
पाहून त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करावा वाटला. यातून मिळालेला आनंद खूप मोठा
आहे. प्रत्येकाने सामाजिक भान जपून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने समाजाच्या उपयोगी
पडावे, असे आवाहन बहुजन रयत परिषदेचे नगर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी
केले.
बहुजन रयत परिषदेचे नगर जिल्हाध्यक्ष बापू गायकवाड यांनी सामाजिक
बांधिलकी जपत देऊळगाव (ता.श्रीगोंदा) येथील "महामानव डॉक्टर बाबा आमटे निवासी
वसतीगृह' येथील अनाथ मुलांसोबत रविवारी (दि.11) मोठ्या उत्साहात वाडदिवस साजरा
केला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हाध्यक्ष
गायकवाड म्हणाले की, मनोरंजन, जेवण, फ्लेक्स्बाजी यावर होणारा खर्च टाळून
समाजाच्या उपयोगाचे कार्य केल्याचे समाधान या मुलांमध्ये राहून मिळत आहे. या
चिमुकल्यांमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर मनस्वी आनंद वाटतो आहे.
यावेळी
झालेल्या शुभेच्छापर कार्यक्रमास संस्थेचे अनंत झेंडे यांच्यासह श्रीगोंदा देखरेख
संघाचे माजी संचालक गुलाबराव तोरडमल, श्रीगोंदा तालुका दूध संघाचे संचालक विनायक
ससाने, आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष उत्तम
रोकडे, खादी ग्रामोद्योगचे माजी संचालक मनोज घाडगे, प्रफुल आढागळे यांच्यासह
"महामानव डॉक्टर बाबा आमटे निवासी वस्तीग्रह'चे सर्व कर्मचारी तसेच वसतीगृहातील
सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी बापूसाहेब गायकवाड यांच्या
वाढदिवसाचा केक कापून वसतीगृहातील मुलींनी त्यांचे औक्षण केले. जिल्हाध्यक्ष
गायकवाड तसेच बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सर्वांचे आभार मानले.