Advertisement
मुंबई : सध्या रस्ते अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच NCRBने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, 2021 या वर्षात तब्बल 1.6 लाख भारतीयांनी आपला जीव रस्ते अपघातात गमावला होता. महाराष्ट्रातले मोठे नेते विनायक मेटे यांचं देखील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. सात एअरबॅग्ज असलेल्या सुरक्षित मर्सिडीजमध्ये असूनही केवळ सीटबेल्ट न लावल्यामुळे मिस्त्री यांचा मृत्यू झाला, असं समोर आलं आहे. यामुळेच आता केंद्र सरकार गाडीमधल्या सीटबेल्ट संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. कारच्या पहिल्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं अनिवार्य आहेच. मात्र कारच्या मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असेल. विशेष म्हणजे सीट बेल्ट न लावणाऱ्यांविरोधात चलान कापलं जाईल.