Advertisement
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काल रात्री अमित शाह मुंबईत आले त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याशिवाय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठीही गेले होते. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अमित शाह यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाच्या बैठकी घेऊन रणनिती आखली आहे, पण या सगळ्या बैठकींमधून पंकजा मुंडे मात्र गायब दिसल्या.
अमित शाह हे आता दिल्लीला रवाना होणार आहेत, त्याआधीही विमानतळावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, पूनम महाजन, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर, संभाजीराव निलंगेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अतुल सावे, विनोद तावडे हे नेते हजेरी लावली. याआधी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आणि आता मुंबई विमानतळावर भाजपची महत्त्वाची बैठक झाली. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यातूनही पंकजा मुंडे गायब आहेत.