Advertisement
मॉस्को येथील पुतळा अनावरण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मॉस्को/पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. रशियात भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटतो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रशियाच्या मॉस्कोमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन्सन इन आर्ट कल्चर अँड लिटरेचर येथे आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली. त्यापूर्वी मॉस्कोमध्ये उभारण्यात आलेला अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा, तैलचित्र याचे अनावरण आज फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, जे वंचितांचे आवाज होते, ज्यांना आयुष्यात एकदाच शाळेत जाण्याचा अनुभव होता. 227 कि.मी. चालून ते पुण्यात आले. शिक्षण नसतानाही पुस्तके, कथा, पोवाडे असे प्रचंड साहित्य निर्माण केले. सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले. भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये तसेच गोवा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी मोठे महत्वपूर्ण योगदान दिले, अशा लोकशाहीरांचा गौरव रशियाने केला याचा मला गर्व वाटतो.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कतृत्वाचा आणि भारत-रशिया संबधांच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठीच नव्हे तर देशासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
