Advertisement
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी
संभाजीराजे मंत्रालयात गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजेंना
तब्बल दीड तास दालनाबाहेर ताटकळत उभे ठेवले, दीड तासानंतरही भेट होत नसल्याने अखेर
छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेल्याची माहिती मिळत
आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा वागणुकीबद्दल तेथे उपस्थिती मराठा समाजाच्या
प्रतिनिधींनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा समाज आरक्षणाच्या
पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालयात गेले होते. सामान्य प्रशासन
विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेत या प्रश्नी संभाजीराजे यांनी आढावा
घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती
संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाचे काही निवडक प्रतिनिधी
उपस्थित होते. याबाबतची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना कळविण्यात आली. परंतु,
तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांना दालनात बोलावण्यात आले नाही. या
कालावधीत संभाजीराजे पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले.
पण, मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्दयावर संभाजीराजे यांनी वारंवार निरोप
देऊनही त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ताटकळत ठेवले. अखेर, प्रतिसाद मिळत
नसल्याचे पाहून छत्रपती संभाजीराजे तडकाफडकी निघून गेले.
