Advertisement
नागपूर : वेदांता फायरफॉक्स पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प सुद्धा गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. अशातच आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. पण, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे 1,185 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसंच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा देखील समावेश होता.
