Advertisement
मुंबई : शिवसेनेतील 40 आमदार फुटून महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे गटात मागच्या तीन महिन्यांपासून इनकमींग सुरू आहे. आता, शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेष म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत युतीसरकारला पाठींबा दिल्याचे सांगितले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काल भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबत नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले. म्हात्रे यांनी युती सरकारला पाठींबा देताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटात शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेतेही सामील होत असल्याने आता राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.
