Advertisement
पुणे : चुलीवरच्या पदार्थांची क्रेझ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण आणि चुलीवरच्या पिझ्झा यानंतर आता पुण्यात चुलीवरचा फराळ बनवण्यात आला आहे. चुलीवरचा हा फराळ वाढती मागणी अथवा मार्केटिंगमुळे नाही तर आंदोलनासाठी बनवण्यात आला. केंद्र सरकारच्या 15 एलपीजी सिलेंडर देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या टिळक रोडवरच्या अभिनव चौकात आंदोलन करण्यात आलं.
1053 रुपये देऊनही वर्षाला 15 सिलेंडरच का? हेच आहेत का अच्छे दिन? अशी पोस्टर घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर करंजी आणि चकली हे पदार्थ बनवले. केंद्र सरकारने सर्वसामन्यांना वर्षाला 15 सिलेंडर मर्यादित केले आहेत. यापुढच्या प्रत्येक सिलेंडरला जास्तचे पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने हे चुलीवरचं आंदोलन केलं.
