Advertisement
मुंबई : शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर हेही आमच्याकडे येणार अशी चर्चा असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.
धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर 15 पैकी पाचही आमदार ठाकरेंकडे शिल्लक राहणार नसल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला आहे. शिवसेना ही आमची आहे, बाळासाहेब ठाकरे हे कोणाची एकट्याची मालमत्ता नाही. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही महाराष्ट्रात काम करत आहोत, असा दावा पाटील यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी चर्चा सुरु झाली आहे.
