Advertisement
जळगाव : चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराती यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सुनावलं. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना चोपडा मतदारसंघ सोडून द्यायच्या आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय प्रदेशाध्यक्षांनी ही बैठक घेतली, यावेळी जयंत पाटील बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की चोपडा मतदारसंघात आपल्याला विधानसभा लढवायची आहे की सोडायची आहे? चोपडा तालुक्यात इतके कमी सभासद असतील तर कसे होणार? अरुणभाई गुजराथी असताना एवढी कमी संख्या कशी? कुणाकुणाची अब्रू घालवणार आहात तुम्ही? अशा शब्दांत त्यांनी पाणउतारा केला. प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, चोपडा मतदारसंघात यावलचे तीन जि.प. गट येतात. आपल्याला विधानसभा लढवायची आहे की सोडायची आहे. आता तर तिथे आमदारही नाहीत.
आपले उमेदवार वळवी आले आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. मात्र वळवी उपस्थित नव्हते. यामुळे जयंत पाटील यांचा पारा चढला. यानंतर त्यांनी चांगलंच सुनावलं. वैतागलेल्या जयंत पाटील यांनी थेट असा प्रश्न विचारला की, ते आपल्या पक्षात आहे का? यासोबतच वळवी सभासद नोंदणीला मदत करत आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र त्यावर तालुका अध्यक्ष काहीच बोलले नाहीत.
