Advertisement
औरंगाबाद : राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शिवाजी पार्कवर एकत्र आले होते, यावर प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे तिघेही उद्धव ठाकरेंना घाबरून एकत्र येतील, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. मात्र, कितीही येऊ दे आम्ही मुकाबला करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले, की भोंग्याचं काय झालं? टोलचं काय झालं? असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे. त्यामुळेच ते महापालिका निवडणुकीत एकत्र येतील असं दानवे यावेळी बोलताना म्हणाले.
अंबादास दानवे यांनी यावेळी तिन्ही नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, की या तिंघाना लोक मोठे नेते का म्हणतात? हेच मला कळत नाही. एकजण 40 आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपणा? याला गद्दारी म्हणतात. एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही आणि फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचं का? असं म्हणत त्यांनी तिन्ही नेत्यांना टोला लगावला.
