Advertisement
लंडन : कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी तो अजून पूर्णपणे गेलेला नाही. आता नव्या लाटेची शक्यता असून ब्रिटनमध्ये यंदाच्या थंडीमध्ये कोरोना गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थाही कोलमडू शकते. ओमायक्रॉनच्या नव्या सबव्हेरियंटनं लसीद्वारे तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार स्वतःला तयार केलं आहे, असं ब्रिटनमधील न्यूज वेबसाईट ‘डेली मेल’च्या एका वृत्तामध्ये म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटमुळे ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो.
कोरोना विषाणूनं जवळपास 2 वर्षं संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं. त्यासाठीच्या लसी आल्यानंतर मात्र कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागला. लोकांमधील रोगप्रतिकार शक्तीही वाढू लागली. मात्र अजूनही कोरोनाचा विषाणू पूर्णपणे निष्प्रभ झाला नाहीये. त्यासाठी अनेक देश अजूनही नागरिकांना मास्क लावण्याच्या, गर्दी टाळण्याच्या व लसीकरणाच्या सूचना देत आहेत. मात्र विषाणूचे गंभीर परिणाम जाणवत नसल्यानं नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये सुरु होणाऱ्या हिवाळ्यामध्ये कोरोनाच्या नवा विषाणूमुळे काय परिणाम होईल, याबाबत डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनमधील आरोग्यसेवेला सूचनावजा इशारा देण्यात आला आहे.
