Advertisement
औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्यापासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, असंही म्हटलं जात आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उद्या रविवारी 23 ऑक्टोबर 22 रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत, असंही सांगितलं जात आहे.
