Advertisement
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकीलला सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.
दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. "उद्धव ठाकरे हे लबाड लांगडे आहेत. कारण ते खूप खोटं बोलतात. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं", असा धक्कादायक आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.
मला मारण्यासाठी देखील उद्धव ठाकरे यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, परंतू मी त्यांना पुरून उरेल. मी आजही जिवंत आहे. मला कोणीही मारू शकलं नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केलं. उद्धव ठाकरेंनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला होता का?, असा प्रश्न देखील राणे यांनी उचलून धरला. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला, असं म्हणत राणे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यावर टीका केली.
