Advertisement
सोलापूर : महाराष्ट्राच्या जडणघडणीत आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे
भरीव मोठे काम आहे. म्हणून त्यांना वस्ताद, वीर आणि शूर असे संबोधण्यात येते. ही
सर्व नावे त्यांना त्यांच्या कर्तुत्ववाने मिळाली आहेत. 229 वर्षानंतरही
आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव प्रत्येक युवकांच्या हृदयामध्ये
आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युगात व त्यानंतरच्या कालखंडात इंग्रजांच्या
विरोधात लहुजी वस्ताद साळवे यांनी खूप मोठा लढा दिला. याचसोबत एक वेगळ्या प्रकारचे
सैन्य निर्माण केले, अशी कामगिरी करण्यासाठी शरीर संपदा असावी लागते, ती
"वस्तादां'कडे होती, त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण
करताना मनापासून आनंद होत असल्याचे बहुजन रयत परिषद संघटनेचे संस्थापक व माजी
मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी
साळवे यांच्या 229व्या जयंतीच्या निमित्ताने सोलापूर येथील जय मल्हार चौकातील
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन व वस्ताद लहुजी साळवे व्यायाम
शाळा समाधान आवळे व नगरसेविका स्वाती आवळे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली आहे.
याचे लोकार्पण सोहळ्यात "शब्दप्रभू' लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते. त्यांनी यावेळी
समाधान आवळे व नगरसेविका स्वाती आवळे यांच्या लोकोपयोगी उपक्रमांबाबत कौतूकही केले.
यावेळी माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती
सेनेचे विष्णू कसबे व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी
बहुजन रयत परिषद संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

