#

Advertisement

Wednesday, November 16, 2022, November 16, 2022 WIB
Last Updated 2022-11-16T11:56:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

एकसंघ समाजाची नितांत गरज : ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे

Advertisement

पुणे : आपल्या समाजाला इतिहासात मोठे स्थान आहे. परंतु, आज, समाज भरकट चालला आहे. राजकारण्यांच्या मागे फिरण्यात, त्यांच्या सतरंज्या उचलण्यात आपले युवक आयुष्य वाया घालवत आहेत. आपला स्वाभिमान गहाण टाकत आपण आपली किंमत कमी करून टाकली आहे. हे बदलण्यासाठी सामाजिक क्रांती घडायला हवी आणि त्यासाठी गरज आहे फक्‍त एकसंघ समाजाची, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले.
संगमवाडी येथील "क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे समिती, ट्रस्ट'तर्फे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रबोधनात्मक विचार मांडताना ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हजारो समाज बांधवांना मार्गदर्शन करताना क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करून त्यांनी विविध मुद्दे विषद केले. ते असे की....

समाजाच्या इतिसाची करून दिली आठवण....
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, या देशात छत्रपती शिवरायांचे स्वराज्य परत यावे हा देश पुन्हा स्वतंत्र व्हावा, स्वाभिमानाने जगावा-वाढावा यासाठी देशात सशस्त्र क्रांतीची सुरूवात करून भारतभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्‍त करण्यासाठी ज्यांनी पहिली क्रांती शाळा सुरू केली आणि अनेक महान क्रांतीकारक घडवून या देशात क्रांतीचे बळ निर्माण केले ते स्वातंत्र्य प्रेरणा पुरुष म्हणजे लहुजी वस्ताद साळवे. 14 नोव्हेंबर 1794 या दिवशी लहुजींचा जन्म पुरंदर तालुक्‍यातील पेठ गावात झाला.
शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ कुटुंब म्हणून साळवे यांचा नावलौकिक होता. हे कुटुंब लढवैय्ये होते. गुप्त बातम्या काढणे, माग काढणे, शत्रुच्या सैन्यात घुसून युद्ध करणे हे कौशल्य आणि धाडस त्यांच्या रक्‍तात होते म्हणूनच पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी साळवे कुटुंबावर सोपवली होती, लहुजी यांच्या वडीलांनी तर जीवंत वाघाला पकडून आणले होते. हे आहे आपल्या समाजाचे सामर्थ्य. पण, आपण आज हे सर्व हरवून बसलो आहोत, त्याचे कारण म्हणजे आज आपल्याला कोणतेही ध्येय राहिलेले नाही. आपला समाज लढवय्या आहे, चिवट आहे, धाडसी आहे. याबाबत इतिहासात अनेक उदाहरणे आहेत.
वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्याची करून दिली आठवण....
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी इतिहास उलगडताना सांगितले की, इंग्रजांच्या लढाईत लहुजी यांना आपल्या वडीलांचा मृत्यू पहावा लागला आणि इथेच क्रांतीची ठिणगी पटली. लहुजी यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, ते सत्यात आणण्यासाठी 1822 मध्ये पुण्यात गंजपेठ येथे तालीम उभारली, हीच देशातील पहिली क्रांतीशाळा आहे. जेथे अनेक क्रांतीकारक घडले. वस्ताद लहुजी यांनी अनेकांत स्वातंत्र्याची चेतना निर्माण केली. यातून इंग्रजांविरोध लढण्याचे बंड उभारले गेले. लहुजी यांच्या तालमीत महात्मा फुले तयार झाले, त्यांच्या शैक्षणिक कार्यातही "वस्ताद' त्यांच्या मागे हिमालया सारखे उभे राहिले. लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके यांनीही वस्तादांच्या तालमीत धडे घेतले. या सर्वांनी इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटले. असा हा संपूर्ण इतिहास मी इथे मांडला आहे. पण, आपण इतिहासातून काहीच धडा घेत नाही. ही खरी शोकांतिका आहे. आपण, फक्‍त आंधळेपणाने विरोधाला विरोध करीत राहिलो, पुढे जाणाऱ्याचे पाय खेचत राहिलो, अशा वृत्तीमुळे समाजाचा ऱ्हास होत आहे. पण, याची कोणालाच कल्पना नाही.
लक्ष्मणराव ढोबळे साहेब "आराध्य' असल्याचे सांगून...
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, पुणे जिल्ह्याला मोठा इतिहास आहे अनेक मोठी माणस या जिल्ह्याने देशाला दिली. बदलाच्या काळात या माणसांनी देशाचा राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. प्रत्येक जण "लहुजी' झाला नाही. पण, काही जणांनी समाज जोडला. माणसं एकत्र आणली. स्वतः मोठे होण्यापेक्षा इतरांना संधी देऊन मोठे केलं आहे. या मागची तळमळ एकच होती ती म्हणजे समृद्ध समाजाची निर्मिती. माझे आराध्य प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या, कामगारांच्या मुला-बाळांना शिक्षण मिळावे, जगाच्या स्पर्धेत ते कोठे मागे पडू नयेत यासाठी "शाहू शिक्षण संस्थे'ची स्थापना केली. मला अभिमान वाटतो. आज हजारो विद्यार्थी या संस्थेमध्ये आपल्या उज्ज्वल भविष्याचे धडे गिरवीत आहेत. ढोबळे सरांनी एकीकडे बहुजनांसाठी शिक्षण संस्था सुरू केलीच तर दुसऱ्या बाजूला "बहुजन रयत परिषद संघटने'ची स्थापना करून बहुजनांना विकासाच्या एका छताखाली आणले आहे. आज, संपूर्ण महाराष्ट्रात ही संघटना जोमाने काम करीत आहे. समाजात हळूहळू बदल घडत आहेत. सांगायचा उद्देश हाच आहे की, ढोबळे साहेबांनी आपले ध्येय कधी सोडले नाही. बहुजन समाज मोठा झाला पाहिजे, सुधारला पाहिजे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी ते या वयातही "फ्रंटलाईन'वर राहून काम करीत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. आज, प्रत्येक जण नेता होण्याचे स्वप्न बघतो यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवतो. पण, कधी "किंग मेकर' होऊन बघा. मार्गदर्शकाची भूमिका घेऊन बघा. वरदहस्त बनून इतरांना काम करण्याची संधी देऊन बघा त्यानंतर गर्दी जमवावी लागत नाही तर तुम्ही जिथे जाल तेथे गर्दी होते. पुन्हा एकदा क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करते आणि थांबते.