Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत सत्तारांचे कान टोचले. आता राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे, असं ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
