Advertisement
मुंबई : महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचं बोललं जात आहे, यावेळी विधानपरिषद निवडणुका या धुसफुशीचं कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातून नागपूर आणि अमरावती या दोन मतदारसंघाची विधानपरिषदेसाठी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा मागत आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे काल महाविकासआघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला काँग्रेस नेते आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी झाल्याचं चित्र आहे.
महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक काल म्हणजेच मंगळवारी 1 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर होणार होती, पण काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं नियोजन करत असल्यामुळे बैठकीला येऊ शकणार नाहीत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या सहा जागांसाठी महाविकासआघाडीचे नेते चर्चा करणार होते, पण आता ही बैठक कधी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
