Advertisement
अहमदनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. आज (दि.23) सरकारने तातडीने पावले उचलत मदतीची घोषणा केली. परंतु तुपकर यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने याची दखल घेत वाशिम आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह आज मुंबईकडे रवाना झाले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ते म्हणाले की, सोयाबीनला साडेबारा हजार तर कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार ते आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. उद्या शेतकऱ्यांचा आवाज समुद्र किनारी घुमणार आहे. तसेच दिवसा विज देण्याच्या मुद्दावरही तुपकर ठाम आहेत.
