Advertisement
मुंबई : रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांच्यात शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादावर.., आमच्या लेखी हा वाद संपलेला आहे, दोघांनाही विनंती आहे की राज्याच्या हितासाठी वाद संपवून पुढे गेलं पाहिजे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचे आरोप केले. या आरोपानंतर वादाला सुरूवात झाली, अखेर शिंदे आणि फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना बोलवून घेतलं, यानंतर वाद संपेल असं वाटत होतं, पण बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळाव्यात राणांना पुन्हा डिवचलं.
रवी राणा यांची ही पहिली वेळ आहे. त्यांना माफ करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद आहे नाहीतर आम्हालाही हातपाय हालवावे लागले असते, असं बच्चू कडू शक्तीप्रदर्शन करत म्हणाले. यानंतर रवी राणा यांनी पुन्हा बच्चू कडूंना इशारा दिला.
प्रेमाची भाषा रवी राणाला 100 वेळा कळते. पण कोणी दम देत असेल तर मी घरात घूसून मारू शकतो. उद्धव ठाकरेंना जुमानलं नाही तर हा कोण? असा पलटवार रवी राणांनी केला. रवी राणांच्या या इशाऱ्यानंतर बच्चू कडू नाराज झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना परत फोन केला. तसंच बच्चू कडू पुन्हा शिंदे-फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
