Advertisement
मुंबई : शिवसेना पक्षाचा हक्क आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग येत्या 12 डिसेंबरला याबाबत पहिली सुनावणी घेणार आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांनी आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर आयोगाकडून सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली. आयोगाच्या नव्या आदेशानुसार दोन्ही गटांना येत्या 9 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कागदपत्रे आयोगाकडे सादर करता येणार आहेत. त्यानंतर 12 डिसेंबरला यावर निवडणूक आयोग पहिली सुनावणी घेणार आहेत.
शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आमचीच शिवसेना खरी आहे, असा दावा त्यांनी केला. दोन्ही गटाने चिन्ह आणि नावावर दावा केल्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यानंतर दोन्ही गटाला निवडणूक आयोगाकडून नव्या चिन्हाचं वाटप करण्यात आलं.
आता या प्रकरणाची पहिली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोग 12 डिसेंबरला घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार दोन्ही गटांना येत्या 9 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कागदपत्रे आयोगाकडे सादर करता येणार आहेत.
