Advertisement
सोलापूर : राजकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापुरात विमानतळ असूनही विमानसेवा बंद आहे. ही विमानसेवा पुन्हा सुरू करावी यासाठी मागील पंधरा दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी चक्री उपोषण करत आहेत. या उपोषणामध्ये डॉक्टर ,उद्योजक ,इंजिनियर्स ,मर्चंट नेव्ही अधिकारी, आयटी कंपन्यांचे संचालक, ज्येष्ठ नागरिक असे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या ठिकाणी स्वाक्षरी अभियान देखील राबवण्यात येत असून त्याला हजारो नागरिकांना पाठिंबा दिला आहे.
सोलापूरात विमानसेवा नसल्याने कोणतीही आयटी कंपनी सोलापुरात आपले उत्पादन सुरू करू शकत नाही, असा उपोषण करणाऱ्या नागरिकांता दावा आहे. शहरात जवळपास सुमारे 25 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. त्यातून जवळपास प्रत्येक वर्षी 1500 ते 2000 विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. सोलापूरात आयटी कंपनी नसल्याने पदवीधर तरुणांना नोकरी करण्यासाठी मुंबई, पुणे ,हैदराबाद, बंगलोर या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. सोलापुरातील जवळपास 35 ते 40 टक्के युवक हे बाहेरगावी नोकरीला आहेत. नियमित विमानसेवा सुरू झाली तर ही अडचण दूर होईल, असा उपोषण कर्त्यांना विश्वास आहे.
