Advertisement
| सोलापूर :
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? याबाबतची चर्चा राज्यभर रंगलेली
असताना कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? यासाठी अनेकांची नावे
सुचविली जात असताना सोलापुरातील दोन नावे समोर आली आहेत. माजी केंद्रीय मंत्री
सुशील कुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे तसेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे
यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचेही नाव आता चर्चेत आहे. सोलापूर
जिल्ह्याने महाराष्ट्राला यापूर्वी मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री दिले आहेत.
त्यामुळे पहिली महिला मुख्यमंत्रीही सोलापुरातूनच होणार, अशी चर्चा सोलापूर
जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. लहुजी वस्तादांच्या जयंती कार्यक्रमात शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य करीत पुढील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही महिला असेल असे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यासह काही नेहमीचीच नावे पुढे आली. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून तेथील काही महिलांच्याही नावांची चर्चा रंगली. यात सोलापूर जिल्हाही मागे नाही. गेल्या दोन दिवसांत सोलापूरने पहिल्या महिला मुख्यमंत्र्याचे नावेही जाहीर करून टाकली आहेत. यामध्ये प्रणिती शिंदे आणि ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे ही नावे आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा असेल तर महिला मुख्यमंत्री झाल्या तरी चालेल? यावर आता राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महिला मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे. यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जात असले तरी या दोघींनीही मोठी पदे भोगली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला नवा चेहरा महिला मुख्यमंत्री म्हणून हवा तर तो सर्वार्थाने नवा असायला हवा, याच कारणातून सोलापूर जिल्ह्यातून प्रणिती शिंदे आणि ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे हे नाव पुढे आले आहे. महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न चर्चेला असला तरी जिल्ह्यातून या दोघींच्या नावाला पसंती मिळत असल्याने आगामी काळातील राजकीय गणितेही यातून स्पष्ट झाली आहेत. | |||
