Advertisement
मुंबई : पहिल्याच अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाने शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पार्शवी चोप्राच्या भेदक माऱ्यानंतर श्वेता सेहरावतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १०७ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान फक्त १४.२ षटकातच पूर्ण केलं.
भारताची फायनलमध्ये लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याशी होणार आहे. या दोन्ही संघामध्ये सेमीफायनल लढत अद्याप झालेली नाही. भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना न्यूझीलंडला १०७ धावात रोखलं. चर्जिया प्लीमरने ३५ तर एजाबेल गेजने २६ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त इतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. तर भारताकडून पार्शवीने ४ षटकात २० धावा देत ३ विकेट घेतल्या.
फलंदाजीत भारताच्या श्वेता सेहरावतने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर संयमी खेळी करत श्वेताने भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. तिने ४५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
