Advertisement
पुणे : पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयने धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
2014 मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झाला होता. यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसिन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप धनंजय देसाई यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2019 मध्ये पुण्यातील हडपसर भागात झालेल्या मोहसिन शेख खून प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यापासून हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई तुरुंगाबाहेर होते. त्यानंतर आता या प्रकरणातून त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर हडपसरमधील बनकर वस्तीमध्ये काही तरुणांनी मोहसीन सादीक शेख (वय 28, रा. बनकर कॉलनी, हडपसर, मूळ- सोलापूर) या तरुणाचा खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात देसाईंचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
