Advertisement
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्स शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहणार असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजप नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत देत आहे. तर दुसरीकडे आम्ही भाजपकडे पाठिंबा मागितला नसल्याचं तांबे यांनी स्पष्ट केल्याने मतदारांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे.
नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही ती एकालाच मिळेल. त्यामुळे भाजपची मत निर्णायक ठरतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे स्पष्ट संकेत आता भाजपकडून मिळाले आहेत. या संदर्भात स्थानिक नेते हे बैठक घेऊन कोणत्या अपक्षाला मतदान करायचा याचा निर्णय घेईल, आम्ही अपक्षाला मतदान करणार असा निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून घेतला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना मतदान करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
