#

Advertisement

Monday, January 30, 2023, January 30, 2023 WIB
Last Updated 2023-01-30T11:15:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शाहू शिक्षण संस्थेच्या भरभराटीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

Advertisement

सोलापूर : शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा नेताना संस्थेचा विस्तार झाला शिक्षणाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अंगावर कर्ज काढून संस्थेसाठी पैसे उपलब्ध करून दिले, आम्ही ते व्याजासहत फेडले, संस्थेच्या भरभराटीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
कोन्हेरी येथील शारदा विद्यालयाचे प्राचार्य सुधीर पुळजे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री ढोबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दत्तात्रय सावंत, सुभाष माने, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड, कोमल ढोबळे, भिमराव जरग, समाधान शेळके, राजकुमार पाटील, सुधीर गायकवाड, रामचंद्र शेळके, सुभाष पाटील, प्राचार्य चिदानंद माळी, अप्पासाहेब काटकर, कृष्णदेव चौगुले, शशिधर पाटील, दादासाहेब वाघमारे, विष्णू चौगुले, दामाजी शिंदे, श्रीरंग माने, बसवराज कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, सत्तेची चव वेगळी असते सत्ता गेल्यावर माणसाची अवस्था फार बिकट होते. मात्र, मी या संस्थेच्या संसारात रमून गेलो, माजलेल्या मस्तवाला आवर घालण्याची ताकद माझ्या मुलीच्या काळ्या कोटात आहे, हेच माझे वैभव आहे आणि त्याच वैभवासाठी कुठल्याही पुढाऱ्याकडे जाऊन मला एखादा महामंडळ द्या, असे म्हणावे लागले नाही. पत्नीचा आधार तुटल्यामुळे माझ्या तीन मुलांना ताकद देणे, ही माझी जबाबदारी आहे. हे करताना माझी अवस्था बशी नसलेल्या कपासारखी झाली, या साऱ्या प्रश्‍नांचे उत्तर मला संस्थेत शिकणाऱ्या मुलांमध्ये दिसत आहे.
माजी मंत्री असल्यामुळे कपाटात तुडुंब सोने मोजायची सवय असायला हवी, मात्र, मी सोन्यासारखी माणसं जपत राज्यभरात शिक्षणाचा डोलारा उभा केला. मात्र, सोलापूर महापालिकेने दिलेल्या 30 लाख थकबाकी नोटीसीची रक्कम तीन टप्यात भरताना माझी दमछाक झाली.
साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी जरा जास्तच बोललो, त्याची चर्चा तालुक्‍यात मोठ्या चर्चा प्रमाणात झाली. मात्र, पाना-फुलाने भरलेल्या या शिक्षण क्षेत्रात बिचाऱ्याने वाकड्या नजरेने कधी पाहिले नाही, हे त्यांच्या नीतीचे लक्षण असून 30 वर्षांत शाळेला कोणताही त्रास दिला नसल्याची जाहीर कबुली माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राजन पाटील यांचे नाव न घेता दिली.
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल करण्यात प्राचार्य सुधीर पुळजे यांनी दिलेले योगदान हे निश्‍चित कौतुकास्पद आहे. याशिवाय त्यांचे संस्थेच्या वाढीसाठी दिलेले योगदान संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, सुभाष माने तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्‍त केले.