Advertisement
मुंबई : काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन झालं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्रानी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. काँग्रेसने महाविकासआघाडीमध्ये नाशिकची जागा मागून घेतली आणि सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला, पण काँग्रेसचा एबी फॉर्म त्यांच्याकडे नसल्यामुळे ते अपक्ष रिंगणात उतरले.
सत्यजीत तांबे यांच्याआधी काँग्रेसने सुधीर तांबे यांचंही निलंबन केलं होतं. नाशिकमध्ये उमेदवारच नसल्यामुळे पाठिंबा कुणाला द्यायचा याबाबत महाविकासआघाडीमध्ये खलबतं सुरू होती. यानंतर आता नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली.
