Advertisement
मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडी एकत्र येणार येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे.
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होती, त्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी आम्ही दादरच्या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला एक विचार आहे, एक पार्श्वभूमी होती. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि आंबेडकर हे समकालीन होते. समाजातील रूढी परंपरावर त्यांनी काम केलं आहे. आज राजकारणामध्ये ज्या काही चाली, परंपरा सुरू आहे. त्या मोडून टाकण्यासाठी दोन्ही वारसादार पुढे आले आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल. जाहीरनाम्यामध्ये मंडल आयोग हे आम्ही लागू करू अशी घोषणा होती. दुर्दैवाने त्यावेळी होऊ शकले नाही. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण झाले आहे, यासाठी आम्ही चळवळ सुरू केली. पण ही चळवळ गिळण्याचा प्रयत्न झाला. आम्ही लढत राहिलो. उमेदवार निवडून येणे हे पक्षाच्या हातात नसून लोकांच्या हातात आहे. त्याला उमेदवारी देणे हे पक्षाचे काम आहे.
