Advertisement
पुणे : महाराष्ट्रातल्या दोन विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. काँग्रेस कसब्यातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेश सचिव मोहन जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कसब्यामध्ये भाजपकडून माजी नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे लढण्याच्या तयारीत आहेत.
याआधी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवरून महाराष्ट्रात मोठं नाट्य रंगलं होतं. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत होती. या निवडणुकीत शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपनेही उमेदवार दिला. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या विनंतीनंतर भाजपने उमेदवार मागे घेतला आणि ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला. आता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकाही बिनविरोध होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
