Advertisement
सोलापूर : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सोलापूर
लोकसभा मतदार संघ कोण लढविणार यामुद्यावर गेली दोन दिवस वादविवाद सुरू आहे. या
वादात आता माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या बहुजन रयत परिषदेच्या
महिलाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी उडी घेत कानपिचक्या घेतल्याने
सोलापुरातील राजकीय नेतेमंडळींचे लक्ष वेधले गेले आहे. विशेष, म्हणजे ऍड. कोमलताई
यांच्या परखड भूमिकेची खुद्द आमदार रोहित पवार यांनीही दखल घेतल्याने सोलापुरातील
राजकारण ढवळून निघाले आहे. रोहित पवार आणि ऍड. कोमलताई यांची राजकीय चर्चेसाठी भेट
झालीच तर सोलापुरातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते.
राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून चर्चेच्या ओघात सोलापूर लोकसभा मतदार
संघावर दावा करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे कोण रोहत पवार?
असा सवाल केल्याने सोलापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत वाक्युद्ध सुरू
असताना यामध्ये भाजपचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड.
कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मात्र पवार आणि शिंदे या दोन्ही आमदारांच्या अशा
वागण्यावर टीका केली आहे.
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी म्हटले की,
महाराष्ट्र भिकेला लागला तरी माझा मतदार संघ शाबूत राहिला पाहिजे, असा अट्टाहास
करणारी टोळीच सक्रिय होत आहे. या दोन्ही आमदारानी मतदारसंघ कोणाकडे असावा या
विषयावर आताच दावेदारी करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधी म्हणून कोणाची कितवी टर्म
आहे? हे कामाने नाही, तर पब्लिसिटी स्टंटने किंवा वडिलोपार्जित विरोध जिवंत ठेवून
विरोधकाचा वारसा चालवून आताचे आमदार वागत आहेत. विधान भवन सोडून नळावरची ऍसेंब्ली
गाजवण्याचा वायफळ प्रयत्न करण्यात त्यांनी वेळ घालवू नये, अशाने जिल्ह्यातले
महत्त्वाचे प्रश्न सुटणार नाहीत. 2024 मध्ये आमदार कोण असेल, हे जनता ठरवेल. पण,
चालु आमदारांनी आपल्या आमदारकीत एखादा ऐतिहासिक निर्णय घ्यावा किंवा एखाद
वर्षानुवर्ष रखडलेले काम स्वतःच्या आमदारकीच्या कारकिर्दीत करावे. जेणेकरून आमदार
हो न हो, पण जनहिताच्या कामाने कायम जनतेच्या मनात राहण्याची जागा तरी कायम राखता
येईल, अशा शब्दात बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे
यांनी या प्रकरणात पवार आणि शिंदे आमदारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
