#

Advertisement

Friday, February 10, 2023, February 10, 2023 WIB
Last Updated 2023-02-10T13:10:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आघाडीतील बिघाडीचा फायदा "भाजप'ला होणार ; भाजपकडून स्थानिक उमेदवाराला संधी की आयात करणार?

Advertisement



विशेष प्रतिनिधी

सोलापूर : लोकसभा मतदारसंघावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या जोरदार वाक्‌युद्ध सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा केल्याने कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार? असा थेट सवाल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे उघड आहे. 2019 मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सिद्धेश्वर स्वामी निवडून आल्यानंतर हा मतदार संघ गेल्या काही वर्षात "भाजप'मय झाला आहे. आगामी 2024च्या लोकसभेसाठी भाजपला टक्कर देणारा उमेदवार कॉंग्रेसकडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही नाही. शिवाय, वर्षानुवर्षे शरद पवार यांच्या वरदहस्त असल्याने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने खासदारकी उपभोगणारे सुशिलकुमार शिंदे यांनीही आता आपण निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. 2019 मध्ये या मतदार संघात भाजपचे डॉ. सिद्धेश्वर स्वामी विजयी झाले असले तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी 70-75 हजार मतांची विजयी आघाडी 2024 मध्ये मोठी ठरणार नसल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते जाणून आहेत. याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत आहेत. आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा त्या ठेऊन असतील तर त्यांची ही अपेक्षा फोल ठरू शकते. कारण, सोलापूर मतदारसंघात लोकसभेसाठी भाजपने यापूर्वीच "हुकमाचा एक्का' म्हणून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तयार ठेवले आहेत. राष्ट्रीवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिष्य म्हणून असलेली ओळख, सलग पाच वेळा आमदारकी आणि त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात लोकनेते म्हणून निर्माण केलेली स्वत:ची ओळख, शाहू शिक्षण संस्था, सूत गिरणी, दामाजी साखर कारखाना आणि बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यामागे ठाम उभे असणारे कट्टर कार्यकर्ते यासह दलित म्हणून मातंग समाजाची मोठी ताकद यावर "लक्ष्मणराव ढोबळे' हे भाजपचे हुकमी एक्का म्हणून सोलापूर लोकसभेची बाजी भाजपला सहज जिंकून देऊ शकतात, हे भाजपचे राज्यातीलच नव्हे तर दिल्लीतील वरिष्ठ नेतेही जाणून आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा म्हणजे आता पोरासोरांची निवडणूक राहिली नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र, आघाडीतील बिघाडीचा फायदा "भाजप'ला होणार का? भाजपकडून स्थानिक उमेदवाराला संधी की आयात करणार? यावरही "निकाल' अवलबूंन आहे.


लोकसभेसाठी "भाजप' का देणार ढोबळे यांना उमेदवारी
सोलापूर मतदार संघाची 2019 मधील लोकसभेची निवडणूक लक्षात घेतली तर भाजपने डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सुशिलकुमार शिंदे हे सहज जिंकून येणार, असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, त्यावेळी सोलापुराच्या राजकारणातील एक कडी निसटली होती. दलितांचे लोकनेते, मातंग समाजाचे नेतृत्त्व आणि बहुजन समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख होती ते माजी मंत्री लक्ष्णमराव ढोबळे यांनी "कमळ' हाती घेतले होते. लोकसभेची जागा निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. विशेष म्हणजे डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना मिळालेली विजयी आघाडीची मत ही दलित समाजाची होती. ही मत आली कोठून तर यामागे ढोबळे नावाचे "दलित कार्ड' होते. परंतु, याबाबत स्वत: ढोबळे यांनी कधीची गवगवा केला नाही. शांत, सयंमी आणि शब्दांवर प्रभुत्व असलेल्या ढोबळे यांनी भाजपचे नेते म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून सोलापूरात काम सुरू ठेवले, त्यांच्या या कामाची दखल दिल्लीतील भाजप नेतृत्वानेही घेतली. आता, आगामी 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांच्या ऐवजी नवा उमेदवार दिला गेला तर लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशिवाय कोणतेही नाव नाही. सोलापूर लोकसभेचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी दलित समाजाचा उमेदवार निवडून येतो. यावेळी तर भाजपला लोकसभेची एक-एक जागा महत्त्वाची असल्याने सोलापूरात आगामी लोकसभेसाठी हुकमी एक्का म्हणून ढोबळे हे "कार्ड' चालविले जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पोरासोरांच्या भांडणाकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे दिसते.