Advertisement
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठींकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करण्यात आली असून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या दाभेकर यांनी काँग्रेसकडे आपली उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दाभेकर यांची मनधरणी सुरू होती, पण ते अपक्ष लढण्यावर ठाम होते. काल रात्री काँग्रसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आल्याने दाभेकर यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
