Advertisement
महार-मांग वतनदार परिषद 82वा वर्धापनदिन कार्यक्रमात स्पष्ट मांडली भूमिका
कसबे-तळवडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजायला देशाला वेळ लागला. त्यामुळे काही समाज माग पडला, त्या समाजाला ताट-वाटी मिळायलाच उशीर झाला, नळाला घागर लावताना ती गळकी नसली पाहिजे, हे मातगांना समजलेच नाही, मित्रांनो डॉ. बाबासाहेबांच्या पुण्याईने समाजाला मिळालेल्या सवलतींची चव मातंग समाजालाही कळली पाहिजे. याचे सूत्र आपल्याही लक्षात यायला पाहिजे. परंतु, आपण हे जाणून घेत नाही. यातून आपले मोठे नुकसान होत आहे. आपण महात्मा गांधींच्या नादाला लागलो. वैचारिक धर्मांतर केले नाही, म्हणून आपलं नुकसान झालं. ते केले असते तर आपल्या समाजालाही लाभांची चव कळली असती. धाकट्या भावाने ते केले. योजना, अनुदानांचा लाभ घेतला, त्यांना लाभ झाला. मातंग समाजाला हे समजलं नाही. हाच फरक "बार्टी'ला सांगितला आहे, अशी भूमिका माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्पष्ट शदांत मांडली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे-तळवडे येथे घेतलेल्या महार-मांग वतनदार परिषदेचा 82वा वर्धापनदिन जयहिंद विद्यालयातील प्रांगणात आयोजन करण्यात आला होता, यावेळी उपस्थित समाज बांधव तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री ढोबळे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर बार्टीचे आयुक्त तसेच विविध समाज बांधव उपस्थित होते.
खुमसदार आणि शैलीदार भाषणात लक्ष्मणराव ढोबळे यांनी विविध दाखले देत अनेकांना आवक् केले. ढोबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्या ओंजळीत भरभरून वैभव टाकले आहे. क्षितीजावर तळपणाऱ्या सूर्याची ताकद त्यांनी आपल्यासमोर शिक्षणाच्या, विचारांच्या स्वरूपात ठेवली आहे, त्याताकदीवरच मला मास्तर होण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांच्या चळवळीने गोरगरिबांना खऱ्याअर्थाने ताकद मिळाली, हे लक्षात ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना महार, मांग वतनदारांची परिषद त्यावेळी घ्यावी लागली. यातून सगळ्यांना एकत्र करावे, पुढे जावे असा बाबासाहेबांचा एकोप्याचा विचार होता. जो त्यांनी पहिल्यांदा या परिदेतून मांडला. बॅरिस्टर वीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब जर सगळ्याच जातीला समजले असते तर आज चित्र वेगळे असते. माणसातल्या जातीवादाचा कलंक जर धऊन टाकला तर कोणतीही मोठी शक्ती असू द्यात ती दुबळ्या माणसाची प्रगती रोखू शकत नाही. यावर डॉ. बाबासाहेब आणि वीर सावरकर यांचेही एकमत होते. पण, हा विचार अनेकांना उमगला नाही, यातून काही जण लाभार्थी तर काही जण दुरार्थीच राहिल्याची खंत ढोबळे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेबांनी सांगून ठेवले
डॉ. बाबासाहेबांनी 1922 मध्ये देशातील सर्व दलितांची पहिली बैठक घेत या समाजाच्या उत्कर्षासाठी आगामी काळात देशाला जातीपातीच्या पलिकडे जावे लागणार असल्याचा स्पष्ट विचार सर्वात प्रथम मांडला. पुढे अनेक देशांचा अभ्यास करून राज्यघटना लिहली. याबाबतही डॉ. बाबासाहेब म्हणतात की, घटना चांगली आहे. अमेरिका, जपान पेक्षाही चांगली आहे. पण, घटना चालविणारे जर नालायक निघाले तर घटनेला दोष देऊ नका तो संपूर्ण दोष ती चालविणाऱ्यांचा असेल, दुर्देवाने त्यांचे हे विचार काही मुद्यांबाबत तरी आज खरे ठरत असल्याचा शालजोडाही ढोबळे यांनी आजच्या काही राज्यकर्त्यांना लगावला.
जगदाळे मामांच्या कार्याचे कौतूक
जगदाळे मामांचा डोक्यावरचा फोटा, काठाचं धोतर, तिन गुंड्यांचा शर्ट, तालेवार चालणं आणि बोलणं यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी याभागात सुरू केलेली शिक्षणाची चळवळ या सगळ्यांतून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था याचा मला अभिमान वाटतो. बार्शीमध्ये लावलेल्या शिक्षणरूपी वडाच्या झाडाची फांदी आज मामांच्या कार्यातूनच कसबे-तळवडेच्या जयहिंद विद्यालयाच्या प्रांगणात जोमाने फुलली आहे, याचा विसर कधी पडू देऊ नका.
अभ्यासातून संतांच्या कविता काढल्याची खंत
प्राध्यापकाच्या भूमिकेतून बोलताना लक्ष्मणराव ढोबळे यांनी संत तुकडोबांची झोपडीत या माझ्या... ही कविता सादर करीत विविध दाखले देत मागदर्शन केले तसेच संतांच्या कविता आता अभ्यासातून काढण्यात आल्याबाबत खंतही व्यक्त केली. मित्रांनो कायदा भिमाचा, फायदा मांगाचा. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो देव्हाऱ्यात लावताना मातंगांनी आपल्या आजोबा, पणजोबाचा फोटो देखील देवाऱ्यावर लावावा, त्यांचे उपकार आपण विसरू नयेत.
मिशी काळी करायची राहून गेली
शाहू शिक्षण संस्थेच्या माधमातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये, लॉ कॉलेज सुरू केली. शिक्षण संस्थेकडे 700 एकर जमिन आहे. एखादा तुकडा घराकडे फिरवता आला असता पण फिरवला नाही. संस्थेसाठी आयुष्य समर्पण केले. आज, या संस्थेत सहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच हजारो शिक्षक, प्राध्यापक कार्यरत आहेत. अंगावर गुंजभर सोने नसले तरी सोन्यासारखी माणसं कमावली आहेत. या सगळ्यात मिशी काळी करायची राहून गेल्याचे लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितल्याने कार्यस्थळी एकच हशा पिकला.


