Advertisement
नाशिक : पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून दाखवली होती. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केल आहे. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. सत्यजीत तांबे यांनी भाजपमध्ये येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही, असं स्पष्टीकरण देखील बावनकुळे यांनी दिल आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...
भाजप हा राजकीय पक्ष आहे. त्यामुळं राजकीय पक्ष वाढवणं हे आमचं काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही...ज्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्यांचा मान सन्मान आम्ही ठेऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
