Advertisement
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कारवाई सुरू केली आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करुन उपोषण केले होते. त्यातून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी मतदान यंत्राचा फोटो व्हायरल करुन मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली होती. याबाबत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्रेहा विसवे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे.
