Advertisement
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात फुलंब्री तालुक्यातील 14 खेडे गावातील 309 महिलांनी एकत्रित येऊन चक्क एक कंपनी स्थापन केली आहे. “अंजिता खोरे हुमन्स फार्मर’ असे या कंपनीचे नाव आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधी उपलब्ध करून देणे आणि पिकवलेला शेतमाल खरेदी करून तो विक्री करणे, यासोबतच नवनवीन पीक पद्धतीत बदल करून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे. या माध्यमातून मधल्या दलालीला चाप बसेल आणि त्यामुळे नफा थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
मराठवाड्यातील वारेगाव, किनगाव, शिरोडी, डोंगरगाव, गणोरी, बोधेगाव, नरला, निढोना, मुर्शिदाबाद वाडी, चौका, बाभुळगाव तरटे, वाघोळा, सांजोळ, वानेगाव अशा एकूण 14 गावांतील तब्बल 309 शेतकरी महिलांनी एकत्र येत ही “अंजिता खोरे वूमन्स फार्मर’ ही कंपनी स्थापन केली. या 309 महिला या कंपनीच्या सभासद आहेत. दिल्ली येथे कंपनीची नोंदही केली आहे.
महाएफसीसीतर्फे कंपनी स्थापनेसाठी महिलांना मदत झाली आणि आयटीसी कंपनीचे मार्गदर्शन लाभले. दिल्लीच्या कार्यालयात 30 हजार रुपये शुल्क भरून रितसर कंपनीची नोंद करण्यात आली. केंद्राचे 10 हजार कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात या महिला कंपनीचा समावेश आहे, असे कंपनीच्या अध्यक्षा पद्मा चव्हाण म्हणाल्या आहेत.
