Advertisement
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा विरुद्ध महाराष्ट्र सरकारच्या वादासंदर्भातील अनुष्काची याचिका मुंबई उच्च हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई उहायकोर्टाने अनुष्काला फटकारलं असून आपिलीय लवादाकडे दाद मागावी असं म्हटलं आहे. लवाद व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात याचिका करण्याचं प्रयोजन काय? असा प्रश्न अनुष्काला हायकोर्टाने विचारला आहे. तसेच विक्रीकर विभागाने या प्रकरणात अनुष्कानेच सेल्स टॅक्स भरला पाहिजे हा युक्तीवाद स्वीकारला आहे. त्यामुळे आता अनुष्काला या कॉपीराईट प्रकरणामध्ये 2.8 कोटींचा सेल्स टॅक्स विक्रीकर विभागाला द्यावा लागणार असल्याची दाट शक्यता आहे.
विक्रीकर विभागाने अनुष्काला सन 2012-13 ते 2015-16 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी बजावलेल्या 4 नोटीसांसंदर्भात आपिलीय लवादकडे दाद मागावी असं हायकोर्टाने अनुष्काला सांगितलं आहे. या ठिकाणी लवादासमोरच्या सुनावणीमध्ये दिलासा देण्यात आला नाही तर तुम्ही हायकोर्टात या, असंही कोर्टाने म्हटलं आहे. अनुष्काने सेल्स टॅक्स म्हणून 2 कोटी 80 लाख भरावेत अशी नोटीस विक्रीकर खात्यानं बजावली आहे. अनुष्काला आता लवादाकडे दाद मागण्यासाठी दंडाच्या रक्केमच्या 10 टक्के रक्कम म्हणजेच 28 लाख रुपये भरावे लागणार आहे.
