Advertisement
चिंचवड : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाल्या पण, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मात्र आपलं डिपॉझिट गमवावं लागलं.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीची एकूण आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या एकूण 28 पैकी 26 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अनेकांच्या मते विजयाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटेचा देखील डिपॉझिट जप्त होणाऱ आहे. कलाटेंना यावेळी केवळ 44 हजार 82 मतं पडली. मात्र ही मते अनामत रक्कम वाचवू शकली नाही.
चिंचवड मतदारसंघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी पोटनिवडणुकीत 2 लाख 87 हजार 145 जणांनी मतदान केलं होतं, या झालेल्या मतदानापैकी एकषष्टांश म्हणजे, 16 पुर्णांक 6 टक्के मतदान म्हणजेच सुमारे 47 हजार 666 एवढं मतदान ज्या उमेदवाराला मिळालं त्यांचीच अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट परत दिली जाणार होती. मात्र विजयी उमेदवार अश्विनी जगताप आणि केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे वगळता कलाटेंसह अन्य 26 जणांना 47 हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही आणि म्हणून त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी भरलेली अनामत रक्कम म्हणजेच डिपॉजिट जप्त झाली आहे.
