Advertisement
मुंबई : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका इथं झाले. यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. मुंबई - गोवा महामार्गाबाबतीत मी दुःखी आहे. 10 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. या रस्त्याच्या कामानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होईल, असे गडकरी म्हणाले.
'मुंबई - गोवा महामार्गाचं काम 9 महिन्यांत पूर्ण करणार'
दरम्यान, गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं होते. अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान आजच्या भूमिपूजनामुळे कामाला गती येईल असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. मुंबई-गोवा महामार्गाचं काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी मुंबई - गोवा महामार्गाचं काम 9 महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे गडकरींनी म्हटले. तसेच कामं न केल्यास, कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
