Advertisement
मुंबई : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.
आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी 28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास 18 लाख सरकारी- निम सरकारी कर्मचारी संपावर होते. आज सुकाणू समितीच शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधान भवनात पोहोचले. एकूण 16 जणांचे शिष्टमंडळ विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.
