Advertisement
मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाता वेगवान घडामोडी घडत आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची (SIT) घोषणा केली आहे. काल विधीमंडळात मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. तर आतापर्यंत मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एकाला ताब्यात घेतलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे साईनाथ दुर्गे यांना काल मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतलं. दरम्यान, आता याप्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
याप्रकरणात ठाकरे गटाने नवा आरोप केला आहे. शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे युवानेते वरून सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे, तो समोर आला पाहिजे असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे याने तो संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेज वर लाईव्ह केला होता. त्यामुळे या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत, ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवल्याचा दावा ही सरदेसाई यांनी केला आहे.
