Advertisement
दिल्ली : सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली. सत्तासंघर्षावरील सुनावणीचा उद्या अखेरचा दिवस. आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. व्हीप आणि अध्यक्षांच्या अधिकारांवर यावेळी सखोल युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वाची टीपण्णी केली. पक्षफूट होते तेव्हा पक्ष सोडलेलाच असतो असं नाही असं कोर्टाने म्हटलंय. सर्वजण पक्षात असतानाही 10वी सूची लागू होते असं चंद्रचूड म्हणाले. बहुमत कोणत्या गटाकडे आहे याचा 10 व्या सूचीवर परिणाम होत नाही असं सरन्यायाधीश म्हणाले. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत असं आम्ही मानतच नाही असं कौल म्हणाले. आम्ही प्रभूंना प्रतोद मानत नाही, त्यामुळे त्यांचा पक्षादेश लागू होत नाही असं कौल म्हणाले. विधीमंडळ पक्षाला राजकीय पक्षाचे अधिकार असल्याचं म्हणताना त्यांनी महाराष्ट्र विधीमंडळ नियमावलीचा उल्लेख केला. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत महाधिवक्ता तुषार मेहता राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील. तर त्यानंतर शेवटचे दोन तास ठाकरे गटाचे वकील पुन्हा रिजॉईंडर मांडणार आहेत. दरम्यान, काल शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी ठाकरे गटाचे मुद्दे खोडून काढले. ठाकरे गटाने राज्यपालांवर शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर अशा प्रकरणात बहुमत चाचणी हाच एकमेव मार्ग असू शकेल. तोच पर्याय राज्यपालांनी निवडला असं कौल यांनी म्हटले आहे.
