Advertisement
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी तब्बल 11 हजार मतांच्या फरकानं भाजपच्या हेमंत रासनेंचा दारूण पराभव केला. भाजपचं वर्चस्व असलेल्या कसब्याच्या गडाला 28 वर्षांनी काँग्रेसनं सुरुंग लावला. भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची पोटनिवडणूक होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसाठी ही निवडणक महत्वाची होती.
प्रचारासाठी दिग्गजांची फौज
भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचाराच्या मैदानात दिग्गजांची फौज उतरवली होती. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे बडे नेते मैदानात उतरले होते. कॉर्नर मीटिंग, रोड शो घेतले. विधानपरिषद निवडणुकीत नागपूर आणि अमरावतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक भाजपला विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थिती जिंकणं गरजेचं होतं. आजारी असतानाही स्थानिक खासदार गिरीश बापट यांना नाकाला ऑक्सिजनची नळी आणि हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून प्रचारात उतरवण्यात आलं.
देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्यनिती फेल
कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वत: तळ ठोकून होते. पुण्यातील मानाचे पाच गणपती हे कसबा विधानसभा मतदारसंघात येतात. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व गणपती मंडळांच्या अध्यक्षांची भेट घेतली. तसंच पुण्यातील बड्या उद्योगपतींसोबत बैठका घेतल्या. यात उद्योगपती पुनीत बालन, फत्तेचंद रांका यांचाही समावेश होता. त्यानंतर प्रचारसभा आणि रॅलीही घेतल्या. ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत, या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मतांचं धृवीकरण केलं जात असल्याचा आरोप करत फडणवीसांनी डाव टाकला. पण कसब्यात फडणवीसांची चाणाक्यनिती चालली नाही. ब्राह्मण समाजाची नाराजी, अँन्टीइन्मबन्सीचा फटका, गिरीश बापटांची अनुपस्थिती या सगळ्यामुळे भाजपला कसब्यात जोरदार फटका बसला.
