Advertisement
मुंबई : मातोश्रीच्या अत्यंत जवळचे असलेले आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी या पक्षप्रवेशाचं कारणही सांगितलं, तसंच सुभाष देसाईदेखील शिवसेनेत प्रवेश करणार का? यावरही भूषण देसाई यांनी उत्तर दिलं आहे.
बाळासाहेब हेच माझं दैवत आहे आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून मला दुसरं काही दिसत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि या राज्यासाठी साहेबांचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे भविष्य आणि विचार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. त्यांना मी जवळून पाहिलं आहे, एकमेकांसोबत काम केलं आहे. कामाचा वेग आणि जे सर्वसामन्य जनतेनं त्यांना काम करताना पाहिले आहे, त्यांच्यासोबत पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझं जे काही सामाजिक कार्य होते ते मी करत होतो. शिंदे साहेबांचं काम पाहून मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.' असं भूषण देसाई म्हणाले.
