Advertisement
माजी खासदार राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप
कोल्हापूर : महसूल, गृह व सार्वजनिक बांधकाम विभाग ही भ्रष्ट्राचाराची कुरण असलेली खाती म्हणून ओळखली जायची. पण आज महसूल, बांधकाम, नगरविकास, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, ग्रामविकास, सहकार, गृह, जलसंपदा, वने, उत्पादन शुल्क, परिवहन यासह शासनाच्या कार्यालयीन कामकाजात अस्तित्वात असलेल्या जवळपास 52 विभागातील अधिकारी यामध्ये तलाठी ग्रामसेवकापासून ते मंत्रालयीन सचिवापर्यंत सर्वच विभागामध्ये जनतेची अडवणूक करून आर्थिक पिळवणूक केली जात आहे, याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत टीका केली आहे
आज प्रत्येक कामात राजरोसपणे पैसे मागण्याची अधिकाऱ्यांची वाढलेली हिम्मत लक्षात घेता त्यांच्या मानगुटीवर व्यवस्थेतील “बदली’’ नावाची सुरी फिरवले असल्याचे स्पष्ट जाणवू लागले आहे. आज या व्यवस्थेमध्ये ग्रामसेवक म्हणतो मी दोन लाख दिले आहेत. तलाठी म्हणतो मी 5 लाख देवून पोस्टींग घेतल आहे. पोलीस निरीक्षक म्हणतो मी 25 लाख दिले आहेत. तहसिलदार म्हणतो मी 50 ते 1 कोटी दिले आहेत.कृषी अधिक्षक म्हणतो मी 30 लाख दिले आहेत. प्रांत म्हणतो मी दिड कोटी दिले आहेत. आर.टी.ओ म्हणतो मी 2 कोटी दिले आहेत. जिल्हाधिकारी म्हणतो मी कोटी दिले आहेत. पोलिस अधिक्षक म्हणतो मी 5 कोटी दिले. नगररचना विभागातील सहाय्यक संचालक म्हणतो मी 3 कोटी दिले आहेत. आयुक्त म्हणतो मी 15 कोटी दिले आहेत. सचिव म्हणतात मलईदार विभागासाठी 25 ते 50 कोटी द्यावे लागतात मग राज्यातील 52 विभागातील जवळपास 17 लाख कर्मचारी व अधिकारी यांचेकडून येणारा एवढा अमाप पैसा कोणाकडे व कशासाठी जात असल्याची टीका राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
