Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांचा काल (रविवारी) अयोध्या दौरा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे नेतेही उपस्थित होते. या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना सत्ताधारी दौरा करत असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर अयोध्येतून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत.
राज्यात मागील दोनतीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सटाणा तालुक्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे देखील सटाणा तालुक्यात दौऱ्यावर आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
