Advertisement
पाथर्डी : महाराष्ट्रातल्या हजारो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाच्या 89व्या फिरत्या नारळी सप्ताहाला महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावात हा कार्यक्रम झाला, यावेळी नामदेव शास्त्रींसोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नामदेव शास्त्री यांनी पंकजा आणि धनंजय यांना आपापसात न भांडण्याचा सल्ला दिला आहे.
'पंकजा मुंडेंसोबत माझं वैर नाही, त्यांचे चमचे खराब आहेत. पंकजांनी अहंकार कमी करावा, स्वाभीमान ठेवा, अंहाकर सोडा,' असा सल्ला नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना दिला. तसंच दोघंही मुंडे घराण्यासाठी आणि समाजासाठी महत्त्वाचे आहेत, असंही नामदेव शास्त्री म्हणाले.
नामदेव शास्त्री यांनी जाहीर भाषणामध्ये दिलेल्या सल्ल्याला पंकजा मुंडे यांनी तोडीचं उत्तर दिलं. 'माझ्या बोलण्याला माझ्या उंचपुऱ्या व्यक्तीमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायात बोलताना मोठा आवाज केलेला त्याला अहंकार समजू नका,' असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना दिलं. स्त्री बोलली तर तो अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ समजतात ही तुमची मानसिकता आहे का? असा सवालही पंकजा मुंडे यांनी विचारला.
